मुंबई. Maharashtra Election Commission S. Chockalingam: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे कार्यालयात प्रत्यक्ष आणण्याऐवजी व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे पाठविल्यास, नियमांनुसार त्यांची पडताळणी करून ती ग्राह्य धरावी, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती आहे.

तसेच प्रत्येक नागरिकाला सुनावणीसाठी कार्यालयात बोलावण्याची किंवा कागदपत्रांसाठी त्यांच्या घरी जाण्याची आवश्यकता नाही. संबंधित नागरिकाने मागितलेली कागदपत्रे व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठविली असतील आणि त्यावरून आवश्यक पडताळणी होत असेल, तर केवळ प्रत्यक्ष उपस्थितीसाठी नागरिकाला बोलावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

288 ERO आणि 7 हजारांहून अधिक AERO बैठकीत सहभागी

SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची (AERO) ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व 288 ERO आणि 7 हजारांहून अधिक AERO सहभागी झाले होते.

बैठकीत SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांची तपासणी, नागरिकांशी संपर्क आणि सुनावणीची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना शक्य तितक्या सुलभ पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता यावी, यावर भर देण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना विशेष दिलासा

    SIR प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या नागरिकांना प्रत्येक प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावण्याची आवश्यकता नसावी, अशी भूमिका चोक्कलिंगम यांनी यापूर्वीही मांडली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि संवेदनशील घटकांतील नागरिकांना अनावश्यकपणे कार्यालयात बोलावले जाऊ नये, यासाठी प्रक्रिया अधिक लवचिक करण्याची गरज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

    EROच्या अधिकारांबाबतही चोक्कलिंगम यांचे पत्र

    SIR प्रक्रियेदरम्यान EROना कायद्याने दिलेले अधिकार प्रभावीपणे वापरता यावेत, यासाठी ECINet प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणीही चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. स्थानिक पातळीवर कागदपत्रांची छाननी करून योग्य निर्णय घेण्यासाठी EROना त्यांच्या कायदेशीर अधिकारांनुसार काम करता यावे, अशी त्यांची भूमिका आहे.

    नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज कमी

    SIR प्रक्रियेचा उद्देश मतदार यादीची अचूकता आणि पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे हा आहे. त्याचवेळी या प्रक्रियेमुळे नागरिकांना अनावश्यक कागदोपत्री प्रक्रिया किंवा प्रत्यक्ष कार्यालयीन फेऱ्या कराव्या लागू नयेत, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून डिजिटल माध्यमांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.

    मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर SIR-2026 संदर्भातील सूचना, ERO-AEROची माहिती, कागदपत्रांची माहिती आणि मतदारांसाठी हेल्पडेस्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. SIR संदर्भातील शंका किंवा मदतीसाठी मतदार हेल्पलाइन 1950 वर संपर्क करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.