जेएनएन, मुंबई. Maharashtra Day: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा 65 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे की, आपली राजधानी मुंबई देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरली आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखले जात आहे अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत असताना ‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करण्याचे आवाहन हे पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्रवीरांना मी आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रस्ते, रेल्वे, धरणं, रुग्णालयं, शाळा-महाविद्यालयं यांसारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती करताना महाराष्ट्राला कला, साहित्य, क्रीडा आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्यावरही विशेष भर दिला, असं ते म्हणाले.
त्यांच्या पश्चात सर्व मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढं नेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील नागरिकांनीही या प्रयत्नांना एकजुटीनं साथ दिली. आता आपण ही एकजुट टिकवून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याचा निर्धार ही अजित पवार यांनी केला.
पतंप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून त्यांच्या हस्ते ‘वेव्हज परिषदेचं’ तसंच इतर विविध विकासकामांचं उद्घाटन होत आहे, याचा महाराष्ट्रवासीयांना विशेष आनंद आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणारं विकासासाठीचं सहकार्य आणि सर्व महाराष्ट्रवासीयांची एकजूटीच्या बळावर आपण महाराष्ट्राला अधिक वेगानं प्रगतीच्या वाटेवर नेऊया, असा दृढ संकल्प करूया असे आवाहन पवार यांनी केलं आहे.