एजन्सी, मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) जुलै 2025 पासून 3 टक्क्यांनी वाढून 58 टक्के केला जाईल, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.
गुढीपाडव्यानिमित्त थकबाकी जमा होणार
या महिन्यापासून सुधारित महागाई भत्ता रोख स्वरूपात दिला जाईल. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीची थकबाकी मार्च 2026 मध्ये गुढीपाडव्यानिमित्त वितरित केली जाईल, तर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीची थकबाकी देण्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे जारी केले जातील.
या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच 8.12 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा
राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले.
