जेएनएन, मुंबई. पूल खात्याकरिता सन 2025-26 च्या सुधारित अंदाजामध्ये ₹5515.09 कोटी व सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 19650 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे. यामध्ये मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणारा मार्ग या दोन मार्गांसाठी मोठी तरतूद करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर…

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून 'गोरेगाव मुलुंड लिंक रोड'साठी 2650 कोटी आणि 'मुंबई किनारी रस्ता' (उत्तर) प्रकल्पासाठी 4700  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणारा मार्ग - या प्रकल्पाचे संरेखन वर्सोवा आंतरबदल ते दहिसर आंतरबदल पर्यंत आहे. तसेच, किनारी रस्त्यावरील माइंडस्पेस मालाड जंक्शन आणि गोरेगांव-मुलुंड लिंक रोडच्या गोरेगाव पूर्व येथील आरंभ बिंदूला जोडणारा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईचे दक्षिण टोक आणि पश्चिम उपनगरे, मुलुंड व ठाण्याशी जोडली जातील. संपुर्ण प्रकल्प जुलै 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे. 

या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय (भारत सरकार), कांदळवन कक्ष (महाराष्ट्र शासन) यांच्या आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकल्पाकरिता मान. उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सद्यस्थितीत, उपयोगिता सेवा वळविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: 

क्षमता - वर्सोवा ते मालाडपर्यंत प्रतिदिन सुमारे 78,000 Passenger Car Units आणि मालाड ते दहिसरपर्यंत 62,000 Passenger Car Units.

    यामध्ये, 14.2 मीटर व्यासाचे भारतातील सर्वात मोठे बोगदे, वाहतूक कोंडी टाळण्याकरिता बहुस्तरीय आंतरबदल, open gantry करीता तरतूद आणि प्रेक्षणीय व्हिविंग गॅलरी यांचा समावेश आहे. 

    फायदे - वर्सोवा ते दहिसरमधील प्रवास कालावधी 30 ते 40 मिनिटांनी कमी होईल. तसेच, कार्बन उत्सर्जनात 48% घट अपेक्षित आहे. 

    दहिसर (प) ते भाईंदर (प) पर्यंतचा उन्नत मार्ग (किनारी रस्त्याचा अंतिम भाग) पश्चिम उपनगरामध्ये गतीमान प्रवासाकरिता आणि मुंबई व भाईंदर शहरांना जोडण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा प्रकल्प हाती घेतला असून या सिग्नलरहीत मार्गामुळे वाहतूक सुकर होणार आहे. प्रतिदिन सुमारे 75,000 Passenger Car Units यांना लाभ होणे अपेक्षित आहे. संपुर्ण प्रकल्प जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.

    हेही वाचा - BMC Budget 2026: बीएमसीचा 4,248 कोटी रुपयांचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर, विद्यार्थांना टॅबसह काय-काय मिळणार मोफत, वाचा सविस्तर

    या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय (भारत सरकार), कांदळवन कक्ष (महाराष्ट्र शासन) यांच्या आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकल्पाकरिता उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

    मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि किनारी रस्त्याचा अंतिम भाग या प्रकल्पांकरिता सन 2025-26 च्या सुधारित अंदाजामध्ये ₹2100 कोटी व सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹4700 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे. 

    गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा प्रतिष्ठित प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा-3 अंतर्गत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे वसाहतीमधून जाणाऱ्या 13 मीटर व्यासाच्या भूमिगत जोड बोगद्याचे काम अंतर्भूत आहे. यामुळे भूमी अधिग्रहणावरील भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल तसेच पर्यावरणास धक्का पोहोचणार नाही. सद्यस्थितीत, गोरेगाव-मुलुंड उड्डाणपूलाचे 48 % काम आणि बोगद्याच्या बांधकामाचे 18% काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प सन 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.

    पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे म्हणजेच गोरेगाव व मुलुंड यामधील प्रवासाचा कालावधी हा 90 मिनिटांवरुन 20 मिनिटे इतका कमी होऊन इंधन खर्चात देखील बचत होईल. तसेच, कार्बन उत्सर्जनात देखील घट होईल आणि मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होईल.  

    गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता सन 2025-26 च्या सुधारित अंदाजामध्ये ₹1100 कोटी व सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹2650 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.