जेएनएन, मुंबई. Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेशात (MMR) मान्सूनचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना शहराची जीवनवाहिनी अखंड सुरू ठेवण्यासाठी महा मुंबई मेट्रोने व्यापक तयारी केली आहे. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सर्व मेट्रो मार्गांवर विशेष नियोजन करण्यात आले आहे.

महा मुंबई मेट्रोने प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत सर्व मार्गांवर अतिरिक्त राखीव (स्टँडबाय) मेट्रो गाड्या तैनात केले आहेत. स्थानकांवरील वाढती गर्दी किंवा कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत या गाड्या तात्काळ सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून सेवा खंडित होण्याचा धोका कमी होणार आहे. 

गर्दीच्या वेळेसह दिवसभर उपलब्ध राहणार अतिरिक्त सेवा 

मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केवळ सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेसाठी मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. हवामानातील बदल, प्रवासी संख्येतील अचानक वाढसह इतर कोणत्याही कारणामुळे आवश्यकता निर्माण झाल्यास दिवसभरात कोणत्याही वेळी या स्टँडबाय सेवा सुरू करता येणार आहे.

मान्सूनमध्ये अनेकदा रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता मेट्रोकडे प्रवाशांचा कल वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन महा मुंबई मेट्रोने अतिरिक्त नियोजन केले आहे. 

तांत्रिक यंत्रणाही सतर्क  

    मान्सून काळात सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक आणि देखभाल विभागांनाही विशेष सूचना देण्यात आले आहेत. रेल्वे मार्ग, विद्युत यंत्रणा, सिग्नल प्रणाली, स्थानक परिसर आणि प्रवासी सुविधांची नियमित तपासणी केली जात आहे. कोणताही तांत्रिक बिघाड उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

    तसेच स्थानकांवर आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी आणि नियंत्रण कक्षांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानातही सेवा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.

    सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासावर भर 

    मुंबईत पावसाळ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत मेट्रो ही तुलनेने अधिक विश्वासार्ह आणि वेळेवर धावणारी वाहतूक व्यवस्था मानली जाते. त्यामुळे मान्सून काळात प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे हे महा मुंबई मेट्रोचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

    मुंबईकरांसाठी दिलासा  

    मान्सूनमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांदरम्यानही शहराची गती कायम राखण्यासाठी महा मुंबई मेट्रोने केलेली ही तयारी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे. अतिरिक्त स्टँडबाय गाड्या, तांत्रिक सज्जता आणि सतत देखरेख यामुळे आगामी पावसाळी दिवसांमध्ये मेट्रो सेवा अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित राहणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

    “मान्सून काळातही प्रवाशांना अखंड, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी महा मुंबई मेट्रो पूर्णपणे सज्ज असून, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत,” असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.