जेएनएन, मुंबई. मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

आरोपी फरार

 ही घटना अंधेरी-बोरीवली दरम्यान घडली. जखमी मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी बोरीवली स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झाला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या हत्याकांडाने मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमध्ये चाकू घेऊन प्रवाशाने प्रवेश केला कसा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, मुंबई लोकलमधील पोलिस सुरक्षा काय करत होती. असाही सवाल समोर येत आहे.

GRP कडून आरोपीचा शोध सुरू

    पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, "गाडी बोरीवली स्थानकावर येताच पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित पावले उचलली. आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) चे जवान काही मिनिटांतच संबंधित डब्यात पोहोचले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासह वैद्यकीय मदतीची व्यवस्थाही विलंब न करता करण्यात आली. जखमी प्रवाशाला त्वरित आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णवाहिकेद्वारे तातडीने शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले." 

    त्यांनी पुढे सांगितले की, "वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवले. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन ते तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले. जखमी प्रवाशाला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळावी, हेच आमचे प्राधान्य होते." दरम्यान, जीआरपीने आरोपीचा शोध सुरू केला असून तो अद्याप फरार आहे.