जेएनएन, मुंबई: महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली.
महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू
बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून 51 टक्के मते घेऊन दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू. राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये भाजप-महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे."
मंगळवारी सकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील विविध भागातील संघटन मंत्री, महामंत्री, मंत्रीमंडळातील मंत्री उपस्थित होते.
भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी
तब्बल तीन तास राज्यातील सर्व निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण बैठकीत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रभाऱ्यांना जास्तीत जास्त महायुतीवर भर देण्याच्या, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून घोषणा केली.
बावनकुळे म्हणजे की, महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजप घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
