जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या (municipal election) तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे 100 नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वीच शतक ठोकले असून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी अनेक ठिकाणी विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार थेट बिनविरोध विजयी झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींमध्ये आणि नगरपरिषदांमध्ये भाजपला मिळालेल्या या मोठ्या आघाडीमुळे पक्षाचे मनोबल अधिकच वाढले आहे. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा मोठा विश्वास आहे. हाच विश्वास बिनविरोध निवडीतून दिसून आला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.

‘अब की बार 100 पार’

मुंबईत भाजपने ‘अब की बार 100 पार’ लक्ष्य ठेवले असून राज्यातील या बिनविरोध विजयानंतर पक्ष अधिक आक्रमकपणे प्रचारात उतरेल, असे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी या बिनविरोध निवडीवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन आणि दबावाचे राजकारण केल्याचा आरोप करत भाजपला लक्ष्य केले आहे.

निवडणूक प्रक्रियेला आता पूर्ण गती मिळाली असून पुढील टप्प्यात कोणत्या पक्षाला जनतेचा किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील ही आगळीवेगळी सुरुवात भाजपसाठी निश्चितच मोठी ऊर्जा देणारी ठरली आहे.