जेएनएन, मुंबई. Gaushiya Chawl landslide: मुंबईत पावसाचा जोर कायम असतानाच सकाळी मोठी दुर्घटना घडली. कुर्ला पश्चिमेकडील चिरागनगर परिसरातील गौसिया चाळ येथे डोंगराचा भाग अचानक कोसळून दरड वस्तीत आली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरड कोसळल्याने परिसरातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास दुर्घटना
सकाळच्या सुमारास गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग अचानक कोसळला. काही क्षणांत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची माहिती मिळताच बचावकार्याला वेग देण्यात आला.
माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
4-5 जण अडकल्याची शक्यता - डीसीपी
डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितले की, "पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. येथे पोलीस कर्मचारी तसेच बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व पथके - ज्यात बीएमसी (BMC), एनडीआरएफ (NDRF) आणि इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे - तैनात करण्यात आली आहेत. ही घटना पहाटे 3 च्या सुमारास घडली. यात सुमारे 4-5 जण अडकल्याची शक्यता आहे."
#WATCH | Maharashtra: DCP Ganesh Shinde says, "Due to the rain, a landslide has occurred in the Ashoknagar area under the jurisdiction of the Ghatkopar police. Two bodies have been recovered so far, and rescue operation is underway. Police personnel are deployed here, along with… https://t.co/K5WzS9hNw5 pic.twitter.com/34bfQwz5VP
— ANI (@ANI) August 12, 2026
पावसामुळे दरडीचा धोका वाढला
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. डोंगर उतार आणि धोकादायक ठिकाणी वसलेल्या वस्त्यांना पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही शहरातील अनेक डोंगर उतारांवरील वस्त्या दरडीच्या संभाव्य धोक्याच्या क्षेत्रात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.
