जेएनएन, मुंबई. Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) आली होती. ही योजना बंद होईल, या योजनेला देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत, असे आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासी व्यवहार आणि सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत निधी देण्यात आला. यावेळी विरोधकांनी आदिवासी विभागाचा निधी वळवला, असा आरोप केला. तर या खात्याचे मंत्री संजय शिरसाट हेही नाराज झाले होते. ती नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली होती. आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवल्याचा आरोप केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे. हा अतिशय चुकीचा दावा आहे. अर्थसंकल्पाची पद्धत ज्यांना समजत नाही ती मंडळी असा आरोप करू शकतात, असं फडणवीस म्हणाले. 

अर्थसंकल्पाबाबतचा नियम असा आहे की, आदिवासींकरिता, अनुसूचित जातींमधील लोकांकरिता लोकांच्या संख्येप्रमाणे निधी राखून ठेवावा लागतो. मात्र, हा निधी राखून ठेवत असताना वैयक्तिक लाभांच्या योजनांना प्राधान्य द्यावे लागते. म्हणजेच जास्तीत जास्त निधी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी राखून ठेवला पाहिजे.

लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यासाठी निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे आदिवासी विभागात दाखवावा लागेल. तोच नियम अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीतही लागू होतो. तो निधी त्या-त्या विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे आम्ही तो निधी अर्थसंकल्पातच त्या विभागात दाखवला आहे. अजित पवारांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, असं फडणवीस म्हणाले.