जेएनएन, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका पुन्हा एकदा उसाच्या प्रश्नावर पेटला आहे. कारखान्यांकडून उसाचा दर जाहीर न करता गाळप हंगामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
शेतकऱ्यांनी वाहने पेटवली
या निषेधातून संतप्त शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या मालकीच्या कारखान्याचे वाहन पेटवून दिले, तर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीलाही आग लावण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश
शिरोळ तालुक्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दर एफआरपीपेक्षा अधिक देय दर जाहीर केलेला नाही. तरीसुद्धा काही कारखान्यांनी दर न सांगता धुरांडी पेटवून गाळप हंगाम सुरू केला.
यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप निर्माण झाला आहे. “दर निश्चित न करता कारखाने सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. इंधन, मजुरी, खतांचा दर वाढला आहे आणि तरीही कारखाने दर सांगत नाहीत.”अशी माहिती शेतकरी यांनी दिली आहे.
आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी
शिरोळ तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी कारखान्याच्या मुख्य फाटकासमोर जमले. सुरुवातीला घोषणाबाजी आणि निदर्शने झाली, मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न करताच परिस्थिती बिघडली. संतप्त जमावाने कारखान्याच्या परिसरातील वाहनांना आग लावली, तर काहींनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ऊस टाकून वाहतूक अडवली. आमदार यड्रावकरांच्या कारखान्याचे वाहन जळाले!
वातावरण तणावपूर्ण
आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या मालकीच्या कारखान्याचा परिसरात शेतकऱ्यांच्या जमावाने अचानक आक्रमक होत कारखान्याचे एक वाहन पेटवून दिले, तसेच परिसरात दगडफेक केली. यड्रावकर समर्थकांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर येथे विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर प्रादेशिक उपसंचालक यांना ऊस दरासंदर्भात निवेदन दिले. 6 नोव्हेंबर पर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जालिंदर पाटील, सावकर मादनाईक, शिवाजी माने, जनार्दन पाटील, भगवान काटे, तसेच शेतकरी उपस्थित होते.
