Kalyan Receptionist Assault Case : कल्याण शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला एका तरुणाने लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी समोर आली होती. तरुण परप्रांतीय असल्याने प्रकरण चांगलेच तापलं होतं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याचे फुटेज समोर आल्याने घटनेला वेगळंच वळण मिळाले आहे.

कल्याणमधील नांदिवली भागात ही घटना घडली होती. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय तरुणाने एका रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये दिसते की, आरोपी गोकुळ झा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला लाथ मारताना दिसत आहे. मात्र या  प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आला असून पीडित तरुणीने आधी एका महिलेच्या कानशिलात लगावली होती, त्यानंतर तरुणाने तिला मारहाण केली. 

याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याच्यासह त्याचा मोठा भाऊ रंजीत झा याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल फक्त मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आज या प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर आला असून सदर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारल्याचं त्यात दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये -

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, गोकुळ झा, रंजीत झा त्यांची आई आणि सून रुग्णालयात उभे असून रिसेप्शनिस्ट तरुणीसोबत काही कारणावरून वादावादी सुरू असल्याचे दिसते. गोकुळ झा तरुणीला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या आईने त्याला शांत करून रुग्णालयाबाहेर नेले. त्यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने  झा कुटुंबातील एका महिलेच्या थोबाडीत मारली, हे पाहून गोकुळ झा बाहेरुन धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीचे केस पकडून जमिनीवर आपटले व लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. 

दरम्यान आरोपीच्या आईने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली आहे. व्हिडिओ कट करून व चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे. त्या तरुणीनेच आधी माझ्या सुनेवर हात उचलला, शिवगाळ केली व थोबाडीतही मारली होती. हे पाहून गोकुळने तिला मारहाण केली. गोकुळची कृतीही चुकीची असल्याचे त्याच्या आईने कबूल केले आहे.