नाशिक.Ashok Kharat police custody: भोंदू बाबा अशोक खरात याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता अधिक चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मान्य करत 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
अशोक खरात याच्यावर महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार आणि आर्थिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. विशेषतः गरोदर महिला आणि अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
कोर्टात काय घडलं?
नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश के. एच. पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. तर अशोक खरातकडून सचिन भाटेंनी युक्तिवाद केला.
सरकारी वकील युक्तिवाद करताना म्हणाले, पोलिसांनी अशोक खरातकडून 6 लाख रुपये, ॲपलचा लॅपटॉप, डीव्हीआर जप्त केले आहेत. तसेच एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हरदेखील जप्त करण्यात आलं आहे. त्यावर भारत सरकारचं चिन्ह आहे. त्यातील 5 गोळ्या वापरण्यात आल्या आहेत. त्या कशासाठी वापरण्यात आल्या याचा शोध घ्यायचा आहे, त्याच्याकडे असलेले साप व वाघाचं कातडं खरं आहे का, हे तपासायचं आहे. तसेच त्याने हरणाची शिकार केली आहे का, त्याने नरबळी दिला आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवणे आवश्यक आहे, असे सरकारी वकील म्हणाले,
पोलीस कोठडीत असताना खरात याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न होणार असून, त्याच्या संपर्कातील इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि कथित गुन्ह्यांचे जाळे उघड करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा आणि इतर कागदपत्रांचीही तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. नागरिकांनीही अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
