मुंबई. Ganeshotsav 2026: गणेशोत्सव तोंडावर असताना प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत निर्माण झालेला संभ्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणामुळे दूर झाला आहे. पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतांमधील विसर्जनासंदर्भातील याचिकांवरील अंतिम निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मात्र, अंतिम निर्णय येईपर्यंत सहा फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचे समुद्र, नदी आणि इतर नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये विसर्जन करण्यास 24 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार परवानगी राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यामुळे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह उंच पीओपी मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणे बंधनकारक राहणार आहे. राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

अंतिम निकाल राखून; जुनाच आदेश कायम

पीओपी मूर्तींच्या निर्मिती, विक्री आणि विसर्जनासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणात पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण आणि गणेशोत्सवाच्या धार्मिक परंपरा या सर्व मुद्द्यांवर सविस्तर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने सुमारे महिनाभर या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर अंतिम निर्णय राखून ठेवला. मात्र, गणेशोत्सव जवळ आल्याने अंतिम निकालापर्यंत कोणती व्यवस्था लागू राहणार, याबाबत स्पष्टता आवश्यक होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने 24 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसारच आगामी गणेशोत्सवात विसर्जनाची व्यवस्था कायम ठेवण्याचे स्पष्ट केले.

सहा फुटांवरील मूर्तींसाठी नैसर्गिक जलप्रवाहांचा मार्ग खुला

    उच्च न्यायालयाच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार सहा फुटांपेक्षा उंच पीओपी मूर्तींचे समुद्र, नद्या आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे. मोठ्या मूर्तींसाठी पुरेशा आकाराचे कृत्रिम तलाव उपलब्ध नसल्याने तसेच त्यांच्या विसर्जनाची तांत्रिक आणि व्यवस्थापनाची अडचण लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली होती.

    त्यामुळे मुंबईसह राज्यातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदाही नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये विसर्जनाचा मार्ग खुला राहिला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या मंडळांचा मोठा प्रश्न तूर्तास सुटला आहे.

    छोट्या पीओपी मूर्तींसाठी कृत्रिम तलावच

    दुसरीकडे, सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येणार नाही. अशा सर्व मूर्तींचे विसर्जन स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांनी उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असणार आहे.