जेएनएन, मुंबई: मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर शहरात सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानक परिसरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा अप्रिय प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलांकडून तपासणी आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.

सामानांची काटेकोर तपासणी सुरू

मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगच्या संपूर्ण परिसरात मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने प्रवाशांच्या सामानांची काटेकोर तपासणी सुरू आहे. डॉग स्क्वॉडच्या मदतीने प्रत्येक बॅग आणि प्रवाशांच्या वस्तूंची चाचपणी केली जात आहे. विमानतळाच्या मुख्य गेटवर तसेच प्रस्थान आणि आगमन विभागात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आणि स्निफर डॉग तैनात

मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर रेल्वेगाड्यांमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांच्या सामानांची तपासणी बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आणि स्निफर डॉगच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.

जवानांचा विशेष बंदोबस्त

    लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढवण्यासाठी 300 अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि 100 बीडीयस (Bomb Detection and Disposal Squad) कोडसह एकूण 400 जवानांना विशेष बंदोबस्तासाठी नेमले आहे. हे जवान रात्रीपासूनच सतर्कपणे गस्त घालत आहेत.

    विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर विमानतळ परिसरातही सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त गस्त वाढवली आहे. संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा सामान आढळल्यास तात्काळ तपासणी केली जात आहे. विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यावरही कडक बंदी घालण्यात आली आहे.

    सुरक्षा दलांच्या मते, काही गुप्त माहितीच्या आधारे हा हायअलर्ट जारी करण्यात आला असून, ही केवळ खबरदारीची उपाययोजना असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि सुरक्षा तपासणीदरम्यान संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.