जेएनएन, मुंबई. हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील 24 तासांत कोकण, मुंबईत मुसळधार पावासाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रातील दुर्गम भाग, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच कोकण–गोवा पट्ट्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेषतः उत्तर कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मुंबईत सकाळपासून पावसाच्या सरी -

मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. दुपार आणि संध्याकाळी पुन्हा काही प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे..

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट-

मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतही विजांसह जोरदार पावसाचा इशारा देत येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.