मुंबई. Maharashtra assembly Monsoon Session 2026: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच, अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा सभागृहात चर्चेचा विषय ठरला. राज्यातील शाळांच्या परिसरात ऊर्जा पेय (एनर्जी ड्रिंक) ‘स्टिंग’ विक्रीवर निर्बंध घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेयाची विक्री बंद करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी सभागृहात दिली.
स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी योग्य नसलेली काही घातक रसायने आढळून आली आहेत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्री वर बंदी घालण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली..
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत सरकारने शाळांच्या परिसरात विक्री रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा-
दरम्यान, राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईचाही अधिवेशनात उल्लेख झाला. राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने कारवाई सुरू असून, भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
आज तुकाराम मुंढे स्वतः विधानभवन परिसरात उपस्थित असल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरू असलेल्या कारवायांबाबत आणि पुढील धोरणांबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगली.
आरोग्य आणि अन्नसुरक्षेवर सरकारचा भर-
सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून राज्यभर अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावरही भर दिला जात आहे.
विरोधकांकडूनही विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न-
पावसाळी अधिवेशनात शेतकरी, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, महागाई, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्याला सत्ताधारी सदस्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात अनेकदा गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ पेय विक्रीबंदीचा निर्णय आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवायांमुळे या अधिवेशनात अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा विशेष चर्चेत राहिला आहे.
