जेएनएन,सोलापूर: काल रात्री सोलापूर शहरात पुन्हा एकदा अतिवृष्टीसदृश मुसळधार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. संध्याकाळनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू राहिला.


शहरातील अवंतीनगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर, तुळजापूर रोड, सिधेश्वर पेठ, तसेच रेल्वे स्टेशन परिसर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्रीभर हैराण झाले. 

 नागरिकांची रात्रीची धावपळ
पावसाचे पाणी नाल्यांतून वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना घरातील सामान हलवावे लागले. काही ठिकाणी वाहनं पाण्यात अडकली, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही काही तास खंडित झाला.

महिन्याभरात दुसरी वेळ
अगदी महिन्याभरापूर्वी याच पद्धतीचा पाऊस शहरात झाला होता. त्यावेळीही अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाने पाणी निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही.

नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
दरवेळी पावसात आमच्या वस्तीत पाणी शिरते. नाले साफ करण्याचं काम केवळ कागदावरच होतं. प्रशासनाने प्रत्यक्षात काहीही केले नाही, अशी नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील कपाशीला फटका; खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकरीची लूट