जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले असून, उभ्या पिकाची अवस्था बिकट झाली आहे. यंदा हवामानाचा ताण आणि बाजारातील मंदी या दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारच्या सीसीआय या शासकीय खरेदी योजनेअंतर्गत केंद्रे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. व्यापाऱ्यांनी आठवडी बाजारात कपाशी खरेदी सुरू केली असली, तरी दर हा अत्यंत तुटपुंजा असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
नुकसानीचे चित्र!
अतिवृष्टीमुळे कपाशीच्या शेंड्यांवर बुरशी, कुज आणि पेंड खराब होण्याच्या घटना वाढले आहेत. काही भागात काढणीस आलेली पहिली वेचणीही पावसात भिजल्याने तिच्या दर्जात घट झाली आहे. त्यामुळे व्यापारी दर्जा कमी असल्याचे कारण देत दर कमी ठेवत आहेत.
कपाशीचा बाजारभाव घटला!
सध्या बाजारात कपाशीचे दर प्रति क्विंटल ५८०० ते ६२०० रुपयांदरम्यान आहेत, तर हमीभाव ७००० रुपयांहून अधिक असायला हवा होता, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण सीसीआय केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दयेवर आहेत.
शेतकऱ्यांची खंत!
दिवाळी साजरी करण्यासाठी थोडाफार पैसा हातात यावा म्हणून आम्ही पहिल्या वेचणीचा कापूस व्यापाऱ्यांना विकला. कमी दर पाहून डोळ्यात अश्रू येत आहे अशी भावना सोनपेठ आणि पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
