जेएनएन, मुंबई Maharashtra Weather Today : |गेल्या पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सकाळपासून आभाळ काळवंडून आले असून काही जिल्ह्यात अंधार पसरला आहे. काही ठिकाणी शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली असून बस सेवा ठप्प झाली आहे. पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत.

कोकणात रेड अलर्ट!

मुंबई उपनगरांसह कोकण, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील  पाऊस परिस्थिती -

मुंबई शहर व उपनगरांत पावसाची संततधार सुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा मोठा फटका बसला आहे.विदर्भ आणि मराठवाडामध्ये नद्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली असून जनावरेही वाहून गेली आहेत. राज्यात पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा हवामान विभागाचा अंदाज -

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबई, ठाणे, रायगड,पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोल्हापूर घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्याला यलो अलर्ट जारी करण्यात आली आहे.