एजन्सी, मुंबई. GBS Cases In Pune: पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. सरकारी ससून जनरल रुग्णालयात 56 वर्षीय महिलेचा जीबीएस मुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. तर राज्यात या आजाराचे आणखी 16 रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत दोघांचा मृत्यू
सोलापूर येथील एका 40 वर्षीय पुरूषाचा संशयास्पद जीबीएसमुळे रविवारी मृत्यू झाला होता. यातच आता पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये एका 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.
16 नवीन जीबीएस प्रकरणे
राज्यात आतापर्यंत जीबीएसचे 127 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी नऊ रुग्ण पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. तसंच, बुधवारी राज्यात 16 नवीन जीबीएस प्रकरणे (GBS Cases In Maharashtra) नोंदवण्यात आली आहेत, असे त्यात म्हटले आहे.
20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर
127 पैकी 72 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. यातील 20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, अशीही आरोग्य विभागानं माहिती दिली आहे.
200 रक्ताचे नमुने तपासले
आतापर्यंत 121 स्टूलचे नमुने शहरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आले आहेत आणि त्या सर्वांची 'एंटेरिक व्हायरस पॅनेल' साठी चाचणी करण्यात आली आहे. 21 नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस पॉझिटिव्ह आढळले आहे तर 5 स्टूलचे नमुने कॅम्पिलोबॅक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एकूण 200 रक्ताचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. सर्व नमुन्यांमध्ये झिका, डेंग्यू, चिकनगुनियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
हेही वाचा - Maha Kumbh Stampede: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाखांची आर्थिक मदत!
144 पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले
"पुणे शहराच्या विविध भागांमधून एकूण 144 पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आणि आठ जलस्रोतांमधील नमुने दूषित आढळले आहेत," असे त्यात म्हटले आहे.
जीबीएस हा एक दुर्मिळ आजार
जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्यामध्ये हातपायांमध्ये तीव्र कमजोरी, सैल हालचाल इत्यादी लक्षणे आढळतात.
दूषित पाण्यामुळे आजार
बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस होतो कारण या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. सध्या पुण्यात आढळलेल्या प्रकरणात, हा आजार दूषित पाण्यामुळे झाल्याचा संशय आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.