जेएनएन, मुंबई. Ganeshotsav 2026: यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबई-ठाण्यातील कोकणवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. मुंबई, ठाणे येथील आपल्या घरापासून कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी बसद्वारे थेट जाता येत असल्याने कोकणवासी नेहमीच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सरासरी ५ हजार बसेस आरक्षित केल्या जातात.”

यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय तसेच गणेशभक्त मंडळांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि निवेदनांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती.

कोकणवासीयांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. त्यानुसार कोकणवासीयांच्या भावनांचा आदर करून यंदा एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.