जेएनएन, मुंबई: गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2025) कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांची हाल-अपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने यंदा मागील वर्षीपेक्षा 367 अधिक फेऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य सरकारची 367 अधिक फेऱ्याची मागणी मान्य केली आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वे व बसमध्ये तिकीट बुकिंग पूर्ण भरल्याने "गावी कसं जायचं?" असा प्रश्न चाकरमान्यांना पडला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिला हिरवा कंदील

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गाड्या सोडाव्यात यावर रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 367 अधिक फेऱ्यांची योजना करण्यात आली आहे त्याला रेल्वेमंत्री यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा! 

गणेशोत्सव हा कोकणवासियांचा सर्वांत मोठा सण असतो. या काळात मुंबई, पुणे, ठाणे व राज्यातील विविध भागांतून लाखो चाकरमानी आपल्या गावी कोकणात परत जातात. मात्र, प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही तिकीट बुकिंग सुरू होताच सर्व तिकीट फुल झाली. रेल्वे व बसमध्ये जागा मिळणे कठीण झाले. त्यामुळे चाकरमान्यांसमोर गावी पोहोचण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. 

    अतिरिक्त फेऱ्यांमुळे मिळणार सुविधा! 

    रेल्वेकडून अधिक 367 फेऱ्या चालवल्या जाणार असल्यामुळे मुंबई-कोकण रेल्वेमार्गावर गर्दी काही प्रमाणात कमी होणार आहे. तसेच एसटी महामंडळ व खाजगी बस ऑपरेटर्सलाही अतिरिक्त फेऱ्यांची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने नियोजन सुरू केले आहे.