जेएनएन, मुंबई: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.

वाढीव दंड रद्द करण्याची मागणी 

गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi 2025) मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी 15000 रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करु नये, असे निर्देश दिले आहेत.

केवळ 2000 रुपये शुल्क आकारले जाणार

आता जुन्या नियमानुसार केवळ 2000 रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळांना केले. 

या निर्णयाचे स्वागत करत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानले.