जेएनएन, मुंबई. मुंबईतील कुलाबा परिसरातील नामांकित रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एकूण 13 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत प्रसिद्ध बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब, कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्स फॅमिली रेस्टॉरंट किऑस्क आणि स्टेटस रेस्टॉरंट यांसह इतर रेस्टॉरंटचा समावेश आहे.

मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कवरही कारवाई

हार्डकॅसल रेस्टॉरंट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून कुलाब्यातील मेट्रो हाऊस येथे चालविण्यात येणाऱ्या मॅकडोनाल्ड्स फॅमिली रेस्टॉरंट किऑस्कच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. FDA ने दिलेल्या कारवाईच्या तपशिलानुसार, स्वच्छतेतील गंभीर उणिवांबरोबरच जिवंत झुरळे आणि अन्न साठवणुकीशी संबंधित त्रुटी आढळल्या. त्यामुळे या किऑस्कचा अन्न परवाना 19 ऑगस्टपासून निलंबित करण्यात आला असून, निलंबनाच्या काळात अन्न उत्पादन, विक्री किंवा वितरण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

रेडिओ क्लबमध्ये माश्या, झुरळे; छताचे प्लास्टरही खराब 

कुलाब्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबच्या तपासणीतही गंभीर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या त्रुटी आढळले. उघड्या भांड्यांच्या परिसरात माश्या, मृत झुरळे आणि झुरळ पकडण्याचे सापळे आढळल्याची माहिती आहे. अन्न तयार करण्याच्या भागातील छताचे प्लास्टर खराब झालेले होते, तर खाद्यपदार्थांच्या जवळ रसायने ठेवण्यात आल्याच्याही नोंदी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर क्लबचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.  

13 आस्थापनांवर एकाचवेळी कारवाई

    महाराष्ट्र FDA ने 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या कारवाईत एकूण 13 खाद्य आस्थापनांवर कठोर पावले उचलण्यात आली. त्यामध्ये कुलाब्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आणि क्लब्ससह खार जिमखान्याचाही समावेश आहे. या कारवाईमुळे मुंबईतील मोठ्या आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांनाही अन्नसुरक्षा नियमांपासून सूट नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

    तुकाराम मुंढे यांच्या FDAची धडक मोहीम

    तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, बेकरी आणि इतर खाद्य आस्थापनांवर तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. 25 मे ते 31 जुलै या काळात FDA ने 3,137 आस्थापनांची तपासणी करून 165 आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची माहिती मुंढे यांनी दिली होती. या तपासणीत मोठ्या प्रमाणात असुरक्षित अन्नपदार्थही जप्त किंवा नष्ट करण्यात आले होते. 

    FDA च्या या नव्या कारवाईमुळे मुंबईतील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगात खळबळ उडाली असून, स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्न साठवणूक आणि स्वयंपाकघरांची देखभाल याबाबत मोठी सतर्कता निर्माण झाली आहे.