जेएनएन, मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Election) राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे.
विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली होती.
प्रमुख प्रचारकांची यादी करावी लागणार सादर
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.
2 डिसेंबर रोजी मतदान
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे.
