जेएनएन, मुंबई. राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महापालिकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यांच्या कडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने आणि आवाहन करण्यात येत आहेत. या सर्वांमध्ये लाडक्या बहिणींवर म्हणजेच, राज्यातील महिलांवर सर्व पक्षांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) मोठे वक्तव्य केलं आहे.
1500 रुपयांमध्ये लवकरच वाढ होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाटकोपरमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं आश्वासन दिलं आहे. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांमध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - PM Kisan Yojana: प्रतीक्षा संपली, या दिवशी खात्यात होतील जमा होतील 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये!
लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले…
“आता लाडकी बहीण योजना सुरू आहे का? आहे ना? सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, आता कोणी आलं आणि काहीही बोललं तरीही ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, आपण आता ते देखील वाढवणार आहोत. आम्ही आमच्या वचननाम्यात जे बोललो ते आम्ही करणार, लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायांवर उभं करणार, लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
अधिवेशनात दिला होता इशारा
मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. ही योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाली असून ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना केले होते की, लाडकी बहीण योजनेतील मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय योग्य वेळी शासकीय नियमानुसार घेतला जाईल.
