मुंबई. Ladki Bahin Yojana Update : राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ आता बंद केला जाणार असून, शासनाकडून मोठ्या प्रमाणावर छाननी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांची माहिती नव्याने गोळा केली जात आहे.
उत्पन्न जास्त असेल तर लाभ बंद-
माहितीनुसार, ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्या महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद केला जाणार आहे. यासाठी महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांची केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे.
मकरसंक्रांतीला 3 हजार रुपये खात्यात-
दरम्यान, पात्र महिलांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र करून मकरसंक्रांतीच्या सणाला थेट महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक महिलांना एकाचवेळी मोठा दिलासा मिळणार आहे.
काही महिलांचा लाभ कायमचा बंद होणार-
शासनाकडून सुरू असलेल्या तपासणीत अनेक अपात्र लाभार्थी समोर येत असल्याची माहिती आहे. अशा महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.
