जेएनएन, मुंबई. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी धक्कादायक बाब समोर आली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात ‘कॅग’ने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशभरातील निवडक रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरमधून घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या यादीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या चार स्थानकांचा समावेश आहे.

कॅगच्या पाहणीत देशातील चार रेल्वे झोनमधील आठ स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलायची उपस्थिती आढळली. दक्षिण रेल्वेच्या कोईम्बतूर आणि पालक्काड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, मध्य रेल्वेच्या चार स्थानकांसह पूर्व रेल्वेच्या मधुपूर स्थानकाचा यात समावेश आहे. 

512 स्थानकांची पाहणी; 458 ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव 

कॅगने देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी  करत 512 बिगर-उपनगरीय (Non-Suburban) श्रेणीतील स्थानकांमध्ये प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेचे ऑडिट केले. त्यामध्ये तब्बल 458 स्थानकांवर म्हणजेच 89 टक्क्यांहून अधिक स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा निकषांनुसार उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे.  

रेल्वे बोर्डाने एप्रिल 2018 मध्ये स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिले होते. मात्र, कॅगच्या पाहणीत अनेक वर्षांनंतरही या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. 

पाण्यात नेमकं काय आढळलं?

    पाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळलेला ई-कोलाय हा जीवाणू मानवी किंवा प्राण्यांच्या मलमूत्रामुळे होणाऱ्या दूषिततेचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. काही प्रकारचे E. coli संसर्ग झाल्यास जुलाब, अन्नविषबाधा यांसारखे आजार होऊ शकतात. गंभीर संसर्गामध्ये मूत्रपिंडांवरही परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या पाण्यात या जीवाणूची उपस्थिती ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जाते.

    क्लोरीनच्या पातळीतही अनियमितता 

    कॅगच्या तपासणीत केवळ ई-कोलायपुरतेच प्रश्न मर्यादित राहिलेले नाहीत. रेल्वेच्या पिण्याच्या पाण्यातील अवशिष्ट क्लोरीनच्या पातळीबाबतही त्रुटी आढळल्या. 2022-23 मध्ये 16 झोनमधील 134 स्थानकांवर, तर 2023-24 मध्ये 15 झोनमधील 134 स्थानकांवर पाण्यातील क्लोरीनची पातळी निर्धारित 0.2 ते 0.5 ppm या मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त आढळली. याशिवाय 11 झोनमधील 62 स्थानकांवर करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक चाचण्यांमध्ये क्लोरीन मिळाले नाही. 

    मध्य रेल्वेसाठी धोक्याची घंटा 

    मुंबई रेल्वे स्थानकावर दररोज प्रचंड प्रवासाची गर्दी असते.अशा परिस्थितीत CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा या स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात ई-कोलाय आढळणे ही बाब विशेष चिंताजनक आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा ही मूलभूत सुविधा असतानाच तिच्या गुणवत्तेची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.