एजन्सी, मुंबई. Disha Salian Case Update: माजी सेलिब्रिटी व्यवस्थापक दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी संयुक्त पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून 2020 मध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

वडिल पोहोचले पोलीस आयुक्त कार्यालयात

अभिनेता सुशांत राजपूत यांची माजी व्यवस्थापक असलेल्या त्यांच्या मुलीच्या जून 2020 मधील मृत्यूच्या परिस्थितीची नव्याने चौकशी करण्याची मागणी करत बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर काही दिवसांनी सालियन त्यांच्या वकिलासह दक्षिण मुंबईतील संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या कार्यालयात गेले.

उच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले आहे की, "दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीयदृष्ट्या संघटित करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला."

या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    ‘माझ्या मुलीसाठी न्याय हवा’

    "मला माझ्या मुलीसाठी न्याय हवा आहे," सतीश सालियन यांनी संयुक्त पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. "मी आता बोलणार नाही. मला चक्कर येत आहे," असे ते म्हणाले.

    पोलिस काय कारवाई करतात, याकडे आमचे लक्ष 

    त्यांचे वकील निलेश ओझा यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार मुंबई पोलिसांना सादर करण्यात आली आहे. आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे आमचे लक्ष असेल.

    दिशा सालियनचा मृत्यू 

    दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी उपनगरातील मालाड येथील एका निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून झाला, बॉलिवूड स्टार राजपूत यांनी त्यांच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये कथितरित्या आत्महत्या करण्याच्या सहा दिवस आधी ही घटना घडली होती.