जेएनएन, मुंबई. ST Bus Ticket Price Hike: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा मोठा झटका लागला आहे. एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता, यावर आज राज्य सरकारने शिक्कामोर्तब केला आहे. शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढ लागू होणार आहे. 

तीन वर्षांची 15 टक्के भाडेवाढ 

गेली 3 वर्षे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नाहीत. त्यामुळे दरवर्षी 5 टक्के प्रमाणे तीन वर्षांची 15 टक्के एसटी महामंडळानं केली आहे. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. (st bus ticket price increase)

टॅक्सीचा दरही वाढणार

तसंच, मुंबईत टॅक्सीचा दर 4 रुपये प्रति किमीने तर रिक्षाचा दर 3 रुपये प्रति किमीने वाढणार आहे. त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा 28 वरुन 32 वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा 23 वरुन 26 वर  जाणार आहे.

    25 जानेवारी मध्यरात्रीपासून

    “राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते. मात्र मागील 3 ते 4 वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित 14.97 टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून तो निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे,” अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.