जेएनएन, ठाणे. Meat Ban Controversy : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत 15 ऑगस्ट रोजी चिकन व मटण विक्रीस बंदीचा आदेश दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. हिंदू खाटीक समाजाने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदू खाटीक समाजाने केली आहे. अन्यथा 15 ऑगस्टच्या दिवशी केडीएमसी मुख्यालयाच्या गेटवरच मटण विक्री करण्याचा इशारा दिला आहे.

या प्रकरणात हिंदू खाटिक समाजाच्या शिष्टमंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आहे. भेटीत बंदीच्या निर्णयाविरोधात लेखी निवेदन देत महापालिकेच्या गेटवरवरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हिंदू खाटीक समाजाने म्हटले की, 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असून, याच दिवशी विक्री बंदी लावण्याचा निर्णय हा व्यापारावर अन्याय करणारा आहे. व्यापाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि अशा बंदीमुळे आर्थिक नुकसान होणार आहे.

केडीएमसीने आपला निर्णय कायम ठेवल्यास, 15 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रत्यक्ष मटण विक्री करून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिंदू खाटीक समाजाने दिला आहे. यामुळे केडीएमसी प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा सचिव प्रशांत माळी यांनीदेखील या निर्णयाचा निषेध केला आहे. माळी यांनी सांगितले की, लोकशाहीत अशा प्रकारे कोणत्याही समाजाच्या व्यवसायावर गदा आणणारे निर्णय योग्य नाहीत.

दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध करत त्यादिवशी मटण पार्टी आयोजित करण्याचा इशारा दिला आहे.