मुंबई. CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJPने आक्रमक भूमिका घेतली असून, आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘जेल भरो’ आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी मिळालेली नसतानाही आंदोलन करण्यावर CJP ठाम असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांवरून CJPकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात मुंबईत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे आज जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे CJPकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, परवानगी मिळाली नसली तरी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका CJPने घेतली आहे. त्यामुळे आज शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

CJPचे अभिजीत दीपके यांनी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील आंदोलनानंतर देशभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असेही दीपके यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शिवाजी पार्क परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

CJPच्या या आंदोलनादरम्यान नेमके किती कार्यकर्ते सहभागी होणार, पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाणार आणि आंदोलकांना ताब्यात घेतले जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.