जेएनएन, मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे यांसह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत ही भरपगारी सुट्टी लागू राहणार आहे. या निर्णयाचा लाभ सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आस्थापनांतील सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी 

लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आवश्यक ती मुभा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे किंवा कामाच्या तासांमध्ये आवश्यक ती सवलत देणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये अनेक खासगी संस्था व आस्थापनांनी ही तरतूद पाळली नसल्याचे निदर्शनास आले होते.

यामुळे मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करता आले नव्हते. हा प्रकार लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत घातक असल्याचे नमूद करत राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. मतदार सहभाग वाढावा, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते.

सुट्टी देणे बंधनकारक राहणार 

    त्यानुसार, आता सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आले असून, संबंधित 29 महापालिकांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व कार्यालये, उद्योग, कारखाने आणि खासगी आस्थापनांवर हा आदेश बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

    दरम्यान, प्रशासनाकडून कामगार, कर्मचारी आणि मालक संघटनांना या निर्णयाची माहिती देण्यात येत असून, 15 जानेवारीला जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे