जेएनएन, मुंबई. मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वा वर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी, तरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या मुंबईत पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द केला आहे. यामध्ये जवळपास 100 वर्षं 161 चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता 500 चौ.फूट जागा मिळत आहे. हा आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये देखील नवीन संधी निर्माण करत आहे. मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकला, आयकॉनिक इमारती, उत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरात उपलब्ध असलेली नवीन तंत्रज्ञान मुंबईत आणायला हवीत. आज बांधकाम क्षेत्रात अशा तंत्रज्ञानामुळे 80 मजली इमारत केवळ 120 दिवसांत बांधली जाऊ शकते. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेची कामे सुरू आहे. सध्या बांद्रा–वर्सोवा सीलिंक प्रकल्प 60 % पूर्ण झाला आहे आणि पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भायंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेस-वे हा मुंबईतील 60% वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर अशी जोडणी सी-लिंकपासून भायंदर -विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वामुळे उत्तरेकडील संपूर्ण भाग रिअल इस्टेट उद्योगासाठी खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.