जेएनएन, मुंबई: महसूल व नोंदणी विभागाच्या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान महसूल सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान बोरीवली व अंधेरी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले.
30 सप्टेंबर 2025 रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इमारतीत झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रघुनाथ गावडे (भाप्रसे), अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई होते. यावेळी जयराम पवार, मुद्रांक जिल्हाधिकारी बोरीवली आणि सुदाम परदेशी, मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुद्रांक शुल्कात मिळाला 13 कोटींचा महसूल
उक्त सेवा पंधरवड्यातील कामकाजात 29 अभिनिर्णय प्रकरणांवर अवघ्या 5 दिवसांत आदेश पारित करण्यात आले. तसेच मुद्रांक शुल्क स्वरूपात तब्बल ₹13 कोटी शासन महसूल वसूल करण्यात आला. त्याचबरोबर, 15 परतावा प्रकरणांमध्ये फक्त 3 दिवसांतच रक्कम देण्याचे आदेश जारी करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये अर्ज दाखल केल्याच दिवशी आदेश देण्यात आले.
विभागाच्या तत्पर कारभाराचे कौतुक
कार्यक्रमादरम्यान अर्जदार व पक्षकारांना मागणीपत्रे आणि आदेशांचे वितरण अपर मुद्रांक नियंत्रक रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. आदेश मिळाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत, विभागाच्या तत्पर कारभाराचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विभागाची सकारात्मक प्रतिमा अधिक दृढ झाली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.