मुंबई. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूह कंपन्यांवरील अडचणी पुन्हा वाढली आहे. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. रिलायंस कम्युनिकेशन कंपनीशी संबंधित प्रकरणात सीबीआयने मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील सात ठिकाणी छापेमारी केली.
माहितीनुसार, 2015 ते 2017 या कालावधीत रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये कार्यरत असलेले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) तसेच काही संचालकांच्या निवासस्थानी आणि संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाने 14 मे रोजी जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे ही छापेमारी करण्यात आल्याचे अधिकृत माहिती मिळाली आहे.
छापेमारीदरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि कंपनीच्या आर्थिक नोंदी जप्त केल्या आहेत. या दस्तऐवजांच्या आधारे निधी वळवणे, कर्जाचा गैरवापर आणि आर्थिक अनियमितता याबाबत तपास अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांत विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एलआयसी) यांनी रिलायन्स समूहाविरोधात आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारी दाखल केल्या होते. या तक्रारींच्या आधारे सीबीआयने रिलायन्स समूहाशी संबंधित एकूण सात गुन्हे नोंदवले आहेत.
तपास यंत्रणांच्या मते, कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा संशय आहे. काही कर्ज रकमा उद्दिष्टांव्यतिरिक्त इतरत्र वळवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकीत राहिल्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, रिलायन्स समूहाकडून अद्याप या कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या छापेमारीमुळे उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
