मुंबई. Iqbal Mirchi properties: कुख्यात अमली पदार्थ तस्कर दिवंगत इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित मुंबईतील वरळी तसेच दुबईमधील स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वेगाने सुरू केली आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा (Fugitive Economic Offenders Act - FEOA) अंतर्गत या मालमत्तांवर कारवाई करण्यात येणार असून, विशेष न्यायालयाने यासाठी ईडीला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीकडून सुरू असलेल्या मनी-लाँडरिंग तपासाचा हा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात या मालमत्ता अधिकृतपणे जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील वरळी परिसरातील अत्यंत मौल्यवान जमिनी आणि इमारती या कारवाईच्या केंद्रस्थानी आहेत.

वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवरील काही भूखंडांचा या प्रकरणात समावेश आहे. या जागेवर पूर्वी ‘सी व्ह्यू’, ‘मरियम लॉज’ आणि ‘राबिया मॅन्शन’ या तीन इमारती अस्तित्वात होते. रिअल इस्टेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मालमत्तांची किंमत शेकडो कोटी रुपयांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. ईडीच्या मते, या मालमत्ता मिर्चीच्या कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांतून उभारण्यात आल्या असल्याचा संशय आहे.

इक्बाल मिर्ची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय मानला जात होता. अमली पदार्थ तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांमधून त्याने मोठी मालमत्ता उभारल्याचा आरोप विविध तपास यंत्रणांनी यापूर्वी केला होता. 2013 मध्ये लंडनमध्ये त्याचा मृत्यू झाला असला तरी, त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांचा तपास अद्याप सुरू आहे.

ईडीने यापूर्वीही मिर्चीशी संबंधित अनेक मालमत्तांवर टाच आणली होती. मात्र, FEOA अंतर्गत होणारी ही कारवाई अधिक व्यापक मानली जात आहे. या कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगारांच्या देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना मिळतो.

दरम्यान, या कारवाईमुळे मुंबईतील उच्चभ्रू रिअल इस्टेट व्यवहारांवर पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या गुंतवणुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांचे मालकी हक्क, व्यवहारांची कागदपत्रे आणि आर्थिक प्रवाह यांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.