मुंबई. Caste Validity Certificate Online Process: राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना करावी लागणारी धावपळ कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने आता ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS – Caste Certificate Verification Information System) विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीमुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच सुनावणीची प्रक्रिया पार पाडणे अशा विविध सुविधा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेले प्रमाणपत्र अर्जदाराला ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्याचीही व्यवस्था प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारंवार जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
ऑफलाइन अर्ज बंद; केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 25 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, जातवैधता प्रमाणपत्रासाठी यापुढे केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्जाची छापील प्रत आणि कागदपत्रे जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या तांत्रिक सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
अर्जापासून सुनावणीपर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल
नवीन प्रणालीमध्ये अर्जदाराला स्वतःची नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, शपथपत्रे आणि इतर पुरावे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची सद्यस्थितीही ऑनलाइन तपासता येणार आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची प्राथमिक तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित अर्जदाराला ऑनलाइन माध्यमातून सूचना दिल्या जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी ई-मेलद्वारेही कळविण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणी
जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अनेकदा अर्जदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी समितीच्या कार्यालयात उपस्थित राहावे लागते. मात्र, नव्या प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह राज्याच्या विविध भागांतून अर्ज करणाऱ्या नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
प्रत्यक्ष सुनावणी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच घेता येणार आहे. तसेच कोणत्याही अर्जदाराचा जातवैधतेचा दावा फेटाळण्यापूर्वी त्याला आपली बाजू मांडण्याची आणि आवश्यक पुरावे सादर करण्याची योग्य संधी देणे बंधनकारक असणार आहे.
60 दिवसांत अर्ज निकाली काढण्याचे उद्दिष्ट
नव्या कार्यपद्धतीनुसार जात पडताळणी समित्यांनी शक्यतो 60 दिवसांच्या आत अर्जांवर निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्जाची तपासणी करताना समितीला आवश्यक वाटल्यास संबंधित शैक्षणिक संस्था किंवा अन्य यंत्रणांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते. तसेच आवश्यकतेनुसार दक्षता पथकामार्फत चौकशीही केली जाऊ शकते.
अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी पुढील दोन महिन्यांत सूचना दिल्या जातील. त्यानंतर पाचव्या महिन्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम संधी दिली जाऊ शकते. तरीही अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा प्रतिसाद दिला नाही, तर समिती नियमानुसार संबंधित प्रकरण निकाली काढू शकते.
आधार क्रमांकाशी जोडले जाणार अर्ज
नव्या प्रणालीमध्ये अर्जदाराचा अर्ज आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे एका व्यक्तीला एकच अर्ज करता येईल. अर्ज करताना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड कराव्या लागणार आहे.
नियमानुसार जातीच्या नोंदीचा आणि निर्धारित मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. संबंधित पुरावे उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करण्याची तरतूदही आहे. मात्र, आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुरावे मागवू शकते.
