जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राची शतकानुशतके जोपासलेली गौरवशाली परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीला राज्य सरकार मोठ्या पातळीवर व्यावसायिक रूप देण्याच्या तयारीत आहे. या खेळाची परंपरा केवळ ग्रामीण महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचावी, पारंपरिक खेळांना आधुनिक पातळीवरील व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘प्रो बैलगाडा लीग’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
गावागावांत बैलगाडा शर्यतीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिंदे म्हणाले की, बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. गावागावांत या शर्यतीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, बैलांचा सन्मान, शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची भावना आणि पारंपरिक क्रीडा संस्कृती या सर्वांचा एकत्रित विचार करून सरकार ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. या खेळाला अत्याधुनिक व्यवस्थापन, नियमबद्धता आणि व्यावसायिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे, यासाठी आगामी काळात ‘प्रो लीग’चे आयोजन करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
ग्रामीण क्रीडासंस्कृतीचे वैभव
शर्यतीत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची मेहनत, बैलांची देखभाल, त्यांच्यावर होणारे प्रशिक्षण हे सर्व घटक ग्रामीण क्रीडासंस्कृतीचे वैभव दाखवतात. त्यामुळे या परंपरेला सुरक्षित, नियमबद्ध आणि भव्य स्वरूप देण्यासाठी राज्य सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
जागतिक मान्यता मिळण्याची संधी
‘प्रो बैलगाडा लीग’मुळे परंपरागत खेळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण भागातील खेळाडूंना नवे उत्पन्नाचे मार्ग, तसेच महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीला जागतिक मान्यता मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. आगामी काळात लीगची संरचना, सामने, सहभागी गावे आणि नियमावली जाहीर होणार असून, शर्यतीचा समावेश पर्यटन विकासासह सांस्कृतिक महोत्सवांमध्ये करण्याचाही सरकारचा विचार आहे.
ही घोषणा झाल्यानंतर ग्रामीण क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून, महाराष्ट्राची ही अनोखी परंपरा नव्या रुपात जगासमोर येण्याची तयारी सुरु झाली आहे.
