जेएनएन, धाराशिव: तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत (Tuljapur Municipal Council Electon) ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने धाराशिव–तुळजापूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपाने अधिकृतरीत्या एबी फॉर्म देत गंगणे यांचे नाव जाहीर करताच स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीकेची झोड उडाली आहे.
ड्रग्ज प्रकरणात गंगणे यांना अटक
विनोद गंगणे यांचे नाव काही महिन्यांपूर्वीच चर्चेत आले होते. तुळजापूरातील मोठ्या ड्रग्ज प्रकरणात गंगणे यांना पोलिसांनी अटक केली होती आणि ते काही काळ धाराशिव कारागृहात बंदी होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि ते बाहेर आले. परंतु, त्यांच्यावरचे गुन्हे अद्याप न्यायप्रक्रियेत प्रलंबित असतानाच भाजपाने त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देणे हा निर्णय अनेकांना वाटला आहे.
भाजपावर टीकेचा वर्षाव
स्थानिक नागरिक, विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी भाजपावर टीकेचा वर्षाव केला आहे. “गुन्हेगारी प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्षपदासाठी उभे करणे म्हणजे लोकशाहीला काळिमा” अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहे. काही कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशीही मागणी केली आहे.
तुळजापूरच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून मात्र या प्रकरणावर मौन बाळगण्यात आले आहे. पक्षाने अधिकृत निवडणूक धोरणाचा भाग म्हणून उमेदवारी दिल्याचे सांगितले जात असले तरी, गंगणे यांच्या निवडणूक सहभागामुळे तुळजापूरच्या राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
या निर्णयाचा आगामी निवडणूक निकालांवर कसा परिणाम होणार, हा प्रश्न आता स्थानिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.