जेएनएन, मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली.
कर्जमाफीच्या घोषणेचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. कर्जमाफीसाठी लावलेले विविध निकष हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून सरकारने हा “निकषांचा खेळ” तात्काळ थांबवावा, अशी मागणी आंदोलक आमदारांनी केली.
निकषांचा खेळ बंद करा
यावेळी “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा”, “निकषांचा खेळ बंद करा”, “शेतकरी उपाशी, कंत्राटदार-बिल्डर तुपाशी” अशा जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. सरकारच्या घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी दरी असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय आहे.
या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
