जेएनएन, मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात (Ajit Pawar Plane Crash Case) मोठा खुलासा समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेचा तपास सध्या Criminal Investigation Department (CID) कडून सुरू असून, या प्रकरणात व्हीएसआर कंपनीच्या मालकाने महत्त्वाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात अपघातासाठी एका व्यक्तीला जबाबदार ठरवत त्या व्यक्तीचं नावही समोर आल्याची माहिती मिळत आहे.

तीन दिवस मालकाची चौकशी

अजित पवार प्रवास करत असलेलं विमान व्हीएसआर कंपनीचं असल्यामुळे कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची CID कडून सखोल चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास आठ तास चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर पुढील तीन दिवस त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.

या चौकशीत विमान खरेदीची प्रक्रिया, तांत्रिक तपासणी, सुरक्षा नियमांचे पालन, विमानाच्या देखभालीसंदर्भातील कागदपत्रे तसेच अपघाताच्या आधीच्या परिस्थितीबाबत तपशीलवार माहिती घेण्यात आली. यासंदर्भात CID चे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनीही चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.

अपघातासाठी एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं

चौकशीदरम्यान व्ही. के. सिंग यांनी नोंदवलेल्या जबाबात विमान कोसळण्यामागे एका व्यक्तीची चूक असल्याचं सांगितलं आहे. संबंधित व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तीचं नावही सिंग यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    तांत्रिक बाबींचाही तपास

    या प्रकरणात विमानाच्या तांत्रिक स्थितीची तपासणी, सुरक्षा मानकांचे पालन, तसेच उड्डाणापूर्वीची तपासणी प्रक्रिया योग्यरीत्या पार पडली होती का याचा CID कडून सखोल तपास केला जात आहे. विमानाच्या देखभाल नोंदी आणि तांत्रिक अहवालही तपासासाठी मागवण्यात आले आहेत. 

    पुढील कारवाईची शक्यता

    व्ही. के. सिंग यांच्या जबाबानंतर CID कडून संबंधित व्यक्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासातील निष्कर्षानुसार या प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

    दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या दुर्घटनेमागील नेमकं कारण काय हे समोर येण्यासाठी तपास यंत्रणा आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत.