मुंबई. BMC Election 2025 : मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात पार पडणार आहे.
या सोडतीनंतर मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाला वेग येणार असून, कोणता वॉर्ड कोणत्या आरक्षणाखाली जाणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहणारे उमेदवार यांच्यासाठी ही सोडत अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
वांद्रे (पश्चिम) येथील बाल गंधर्व रंगमंदिर सभागृहात ही सोडत काढण्यात येईल. प्रारूप आरक्षण यादी 14 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाईल आणि नागरिक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या आराखड्यावर आपल्या हरकती आणि सूचना नोंदवू शकतात. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी बीएमसी वेबसाइट पहावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
माजी नगरसेवकांसमोर नवे आव्हान-
वॉर्ड आरक्षणात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याने, अनेक माजी नगरसेवकांना आपल्या जुन्या प्रभागातून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे केलेली विकासकामे आणि मतदारसंघातील संपर्क यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. परिणामी, या नेत्यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.
उमेदवार निवडताना होणार कसरत -
दरम्यान, राजकीय पक्षांनाही आरक्षणनिहाय उमेदवार ठरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. महिलांसाठी, अनुसूचित जाती-जमातींसाठी किंवा सर्वसाधारण श्रेणीतील प्रभाग कोणते असतील, हे ठरल्यानंतरच पक्षांचे तिकीट वाटपाचे गणित स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेना (दोन्ही गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) तसेच मनसे यांचे रणनीतीकार आता सज्ज झाले आहेत.
निवडणूक तारखेकडेही सर्वांचे लक्ष-
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर, पालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा आणि कार्यक्रमपत्रिका जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून विलंब होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे नागरिकांचे, प्रशासनाचे आणि राजकीय पक्षांचे समान लक्ष लागले आहे.
