जेएनएन, मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी भाजपने तयारीचा बिगुल फुंकला आहे. सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने भाजपने स्पष्ट रणनीती आखली असून, 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. दरम्यान, महायुतीच्या घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला शिंदे गट 65 ते 75 जागा देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई मनपावर पुन्हा एकदा मोठी लढाई
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक संस्था असून, तिचा वार्षिक अर्थसंकल्प तब्बल 50 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळेच मनपा निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या ताब्यात राहिलेली मुंबई मनपा आता भाजपच्या लक्ष्यावर आहे.
भाजपचा ‘Mission 150’
भाजपने या निवडणुकीसाठी ‘Mission 150’ ठरवलं आहे. मुंबईतील सर्वच वॉर्डांमध्ये पक्षाने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून, मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहित अनेक मंत्री आणि खासदार सातत्याने मुंबई दौऱ्यावर आहेत.
- प्रत्येक विभागात प्रभागनिहाय बूथसंपर्क मोहिमेची अंमलबजावणी!
- तरुण मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित!
- पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर प्रचार!
युतीसाठी फॉर्म्युला तयार?
महायुतीच्या युतीत शिवसेना शिंदे गटाला 65 ते 75 जागांची ऑफर देण्याची तयारी आहे. उर्वरित जागांवर भाजप स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि रिपाइं यांनाही काही ठिकाणी प्रतीकात्मक जागा देण्यात येणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या गटाशी थेट सामना
यावेळी लढाई केवळ महापालिकेच्या सत्तेसाठी नाही, तर ती शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशा स्वरूपाचीही होणार आहे. भाजपने उद्धव सेनेचा पारंपरिक मतदारवर्ग मराठी माणूस, झोपडपट्टी परिसर आणि कर्मचारीवर्ग यांच्यावरही लक्ष केंद्रित करण्याची तयारी केली आहे.
