जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी (BMC Election 2026) महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुतीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप एकत्र असले, तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षात तणाव पाहायला मिळत आहे.
शिवसेनेची 125 जागांची मागणी
माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेवर दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहिल्याचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपकडे तब्बल 125 जागांची मागणी केली आहे. एकूण 227 सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेने निम्म्यापेक्षा जास्त जागांवर दावा केल्यामुळे महायुतीतील समीकरणे तापली आहेत.
राष्ट्रवादी बाहेर, शिवसेनेचा दावा मजबूत
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुतीचा भाग नसणार, हे जवळपास स्पष्ट झाल्याने शिवसेनेने त्याचा राजकीय फायदा घेत आपली मागणी आक्रमकपणे मांडल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून मुंबईतील पारंपरिक ताकद, शाखा व्यवस्था आणि पूर्वीची सत्ता याचा आधार देत 125 जागांची मागणी करण्यात आली आहे.
भाजपचा प्रतिप्रस्ताव – 60 जागा
महायुतीच्या बैठकीत शिवसेनेच्या मागणीनंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेला केवळ 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भाजपने मागील निवडणुकांतील निकाल, सध्याची वॉर्डनिहाय ताकद, आमदार–खासदारांचे प्रभावक्षेत्र आणि संघटनात्मक स्थिती यांची आकडेवारीसह यादी शिवसेनेसमोर ठेवल्याची माहिती आहे. माहितीनुसार, भाजपने वॉर्डनिहाय संभाव्य जागांची सविस्तर यादी तयार केली असून, त्याच आधारे चर्चा सुरू आहे.
गुरुवारी वॉर्डनिहाय चर्चा
या पार्श्वभूमीवर, गुरुवारी भाजप-शिवसेना यांच्यात वॉर्डनिहाय सविस्तर चर्चा होणार आहे. कोणत्या भागात कोणत्या पक्षाची ताकद आहे, कोणत्या वॉर्डमध्ये कोण उमेदवार देणार, प्रचाराची रणनीती काय असेल, यावर या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे.
महायुतीसाठी कसोटी
मुंबई महापालिकेतील जागावाटप ही महायुतीसाठी मोठी कसोटी मानली जात आहे. शिवसेनेची 125 जागांची आक्रमक मागणी आणि भाजपचा 60 जागांचा प्रतिप्रस्ताव यामधील मोठी दरी कशी भरून निघते, याकडे पक्ष कार्यकर्त्याचा लक्ष लागले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजप युती टिकणार की तणाव वाढणार, हे येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.
