मुंबई. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असताना, उमेदवार आयातीच्या बाबतीत भाजप अव्वल ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये भाजपकडून तब्बल 330 हून अधिक बाहेरून आलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, इतर पक्षांतून आलेल्यांवर भाजपनं मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर अनेक ठिकाणी उमटले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट) आणि शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना थेट तिकीट देण्यात आल्याने ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती पुन्हा चर्चेत आली आहे.
मुंबईतही आयातांवर भाजपची भिस्त -
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही भाजपकडून आयातीत उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. मुंबईत किमान 15 आयाराम नेत्यांना थेट उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख तसेच इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता-
भाजपच्या या धोरणामुळे अनेक ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलले जात असताना, निवडणुकीच्या तोंडावर आलेल्यांना तिकीट देण्यात येत असल्याने बंडखोरीचे संकेतही काही महापालिकांमध्ये दिसून येत आहेत.
विजयासाठी गणित की विचारधारेला तडा?
भाजपकडून ‘जिंकण्याची क्षमता’ हाच उमेदवार निवडीचा प्रमुख निकष असल्याचं सांगितलं जात असलं, तरी मोठ्या प्रमाणावर झालेली आयात पक्षाच्या मूळ विचारधारेला धक्का देत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. भाजप सत्तेसाठी ही रणनीती वापरत असली, तरी त्याचा फटका निवडणुकीनंतर पक्ष संघटनावर बसणार आहे.
