मुंबई. Atal Setu Toll Free For Electric Vehicles : महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा देत अटल सेतू मार्गे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पूर्णपणे टोल माफ केला आहे. राज्य सरकारचा हा नियम आजपासून म्हणजेच शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आहे. महाराष्ट्राच्या शाश्वत वाहतूक मोहिमेतील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी इलेक्ट्रिक वाहनांना (EV) अटल सेतूवर टोलमाफी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) धोरणांतर्गत एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेले हे धोरण आता राज्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एकावर लागू केले जात आहे. येत्या दोन दिवसांत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी एक्सप्रेस वे वर देखील EV टोल सूट लागू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. चारचाकी वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक बसेसनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे..

नवीन ईव्ही टोल नितीचा काय फायदा?

महाराष्ट्र सरकारचे हे ईव्ही टोल सूट धोरण कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, हानिकारक प्रदूषकांना आळा घालण्यासाठी आणि स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे. एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या महाराष्ट्र ईव्ही धोरणात प्रमुख महामार्गांवर टोल सूटसह इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अनेक फायद्यांवर चर्चा करण्यात आली होती. योजनेनुसार, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या चारचाकी ईव्ही आणि बसेसना टोल शुल्कातून सूट देण्यात येईल.

अटल सेतूवर भरावा लागायचा 250 रुपये टोल टॅक्स -

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांनाही 50% सूट मिळेल. एका अंदाजानुसार, अटल सेतूवरून दररोज 60,000 वाहने जातात. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही मोठी आहे. अटल सेतूवर एका कारला 250 रुपये टोल टॅक्स भरावा लागत होता.

    नवी नुंबई आणि मुंबई दरम्यान समुद्रावर बांधलेला अटल सेतू हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल आहे. या पुलाच्या मदतीने नवी नुंबई आणि मुंबईमधील अंतर फक्त 20 मिनिटांवर आले आहे. या पुलाची लांबी 21.8 किलोमीटर आहे आणि हा 6 पदरी पूल आहे.