नवी मुंबई. भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्याशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उरण परिसरात खरातने स्वस्त दरात जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.

उरणमध्ये जमिनीचा संशयास्पद व्यवहार-

माहितीनुसार, उरण तालुक्यातील चाणजे गावात खरातने सुमारे 58 लाख 50 हजार रुपयांना जमीन खरेदी केली. मात्र, याच जमिनीचा बाजारभाव अंदाजे 3 ते 4 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अटकेच्या दिवशीच वर्दी नोटीस-

या व्यवहारात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खरातला अटक झालेल्याच दिवशी या जमिनीबाबत वर्दी (नोटीस) प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोठडीत असताना फेरफार मंजूर-

    विशेष म्हणजे, खरात कोठडीत असतानाच अवघ्या महिन्याभरात, 13 एप्रिल रोजी या जमिनीच्या व्यवहाराची फेरफार (mutation) नोंद मंजूर करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

    ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाचा संदर्भ-

    उरण परिसर हा प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पासाठी महत्त्वाचा मानला जातो. भविष्यात या भागातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने, या पार्श्वभूमीवर स्वस्तात जमीन खरेदी केल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे.या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासन आणि महसूल विभागाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आले नाही.