नाशिक. भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता या प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्याने खरातला गर्भपात प्रकरणात मदत केल्याची शक्यता तपासली जात आहे.

विशेष तपास पथक (SIT) कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार नाशिकमधील चार डॉक्टरांनीही खरातला गर्भपातासाठी आवश्यक औषधे मिळवून देण्यात मदत केल्याचा संशय आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सहभागाचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.

तपास यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार, काही खासगी क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरही SIT च्या रडारवर आले आहेत. या केंद्रांमध्ये बेकायदेशीर तपासण्या किंवा गर्भपाताशी संबंधित प्रक्रिया झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर आणि केंद्रांच्या नोंदी, व्यवहार आणि परवान्यांची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या संपर्कातील व्यक्तींची यादीही SIT कडून तपासली जात आहे. त्यामध्ये काही राजकीय व प्रशासकीय संबंध उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणामुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.